Home » , » जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात

जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात

Written By Kaustubh Shukla on Saturday, January 28, 2012 | 9:10 PM



शाहिस्तेखानाने मराठ्यांच्या भूगोलाचा आणि गनिमी काव्याचा कधी विचारच केलेला दिसत नाही. पुण्यात आल्यापासून त्याला नाव घेण्यासारखा फक्त एकच विजय मिळाला. तो चाकणवरचा. त्याने या विजयानंतर पूर्ण पाच महिने आराम केला. आपल्या छावणीतील सर्व बातम्या मराठी हेरांच्या मार्फत शिवाजीराजाला बिनचूक पोहोचत आहेत , याची त्याला कल्पनाही नसावी. त्याने जानेवारी १६६१ मध्ये एक मोठी मोहीम कोकणातील मराठी प्रदेशावर करण्याचा आराखडा आखला.

या मोहिमेचे सेनापतिपद त्याने कारतलबखान उझबेक या सरदाराकडे सोपविले. हा खान घमेंडखोर होता. याच्याबरोबर अनेक सरदार नेमण्यात आले. त्यात सावित्रीबाई देशमुख उर्फ पंडिता रायबाघन ही हुशार , वऱ्हाडी सरदारीणही होती. खानाच्या फौजेचा नक्की आकडा उपलब्ध नाही. पण तो पंधरा हजारापेक्षा कमी नक्कीच नव्हता. शाहिस्तेखानाने या कारतलबला पेण , पनवेल , नागोठणे हा भाग जिंकावयाचा हुकूम
केला. पण हा कारतलब असा अतिउत्साही म्हणजेच घमेंडखोर होता की , त्याने म्हटले की , ' हुजूर , नागोठणे , पेण , पनवेल तर मी काबीज करतोच , पण कोकणातील शिवाजींचे कल्याण भिवंडीपासून ते दक्षिणेकडे (महाडकडे) असलेली सारी ठाणी आणि मुलूख कब्जा करतो. 'कारतलबखानाच्या या साऱ्या आत्मविश्वासाचा आणि युद्धतयारीचाही तपशील महाराजांना राजगडावर अचूक
पोहोचला. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात तो पुण्याहून निघाला. आपण कुठे जाणार आहोत , आपला मार्ग कोणचा , शिवजीराजांचा तो मुलूख कसा आहे. इत्यादी कोणतीही माहिती त्याने आपल्या हाताखालच्या सरदारांना सांगितली नाही. ही गोष्ट रायबाघन या हुशार आणि शूर असलेल्या सरदारणीला आश्चर्याची वाटली. शिवाजी , सह्यादी , मावळे , गनिमी कावा आणि कोकणी प्रदेश याची तिला चांगली
जाण होती. पण तिने कारतलबशी एका शब्दानेही चर्चा वा विचारणा केली नाही. पण हा खान अंधारात उडी मारतोय , नक्की आपलं डोकं फुटणार याचा अंदाज तिला लोणावळ्याजवळ पोहोचल्यावर आला.

खानाने लोणावळ्यापासून खाली कोकणात उतरणारी आंबेनळीची वाट धरली. खानाचे सैन्य सह्यादीच्या दऱ्याखोऱ्यांत अगदी अनभिज्ञ , म्हणजेच अडाणी होते. आंबेनळीच्या पायथ्याशी चावणी नावाचे बारीकसे गाव होते. त्याच्या परिसरात खान पोहोचला. चावणीपासून ऐन कोकणात जाणारी अरुंद वाट होती. गर्द जंगलातून आणि दोन्ही बाजूला असलेल्या डोंगरातून ही वाट जात होती. ही वाट साडेचार कोस म्हणजेच १५ किलोमीटर अंतराची होती. खानानं या मार्गाने आपल्या सैन्याला चालण्याचा आदेश दिला. या वाटेचे नाव ऊंबरखिंड असे होते. हा दिवस होता दि. २ फेब्रुवारी १६६१ . मोगली फौज त्या भयंकर वाटेने चालू लागली. त्यांना कल्पना नव्हती की , पुढे काय वाढून ठेवले आहे. पुढे या वाटेच्या पश्चिम टोकावर एका टेकाडावर झाडीझुडपांत प्रत्यक्ष शिवाजी महाराज घोड्यावर स्वार होऊन उभे होते. आणि या १५ किलोमीटरच्या गर्द झाडीत कमीतकमी पाच हजार मावळे जागोजागी
खाचीकपारीत आणि झाडांच्या दाट फांद्यावरही सशस्त्र लपून बसले होते. ही फौज वाघांच्या जाळीत मेंढरांनी शिरावं , तशी चालली होती. शिवाजीराजांना या शत्रूचालीची खबर सतत समजत होती. त्यांच्या मनात कोवळी दया उपजली. ही सारी मोगली फौज आता टिप्पून मरणार हे नक्की होतं. महाराजांना दया आली असावी ती त्या सावित्रीबाई रायबाघनची. महाराजांनी आपला एक वकील वेगळ्या माहितीच्या
वाटेनं कारतलबखानाकडे पाठविला. खान चावणी गावाजवळ म्हणजेच पूर्ण पिछाडीस होता. रायबाघनही तेथेच होती. मराठी वकील खानाजवळ जाऊन पोहोचला. त्याने अदबीने खानाला महाराजांचा निरोप सांगितला , ' आपण चुकून आमच्या मुलखात आलेले दिसता. आपण अजूनही त्वरित माघारी निघून
जावे , नाहीतर वेळ कठीण आहे. आमची विनंती ऐकावी. '

यावर खानाला जरा रागच आला. त्याने जबाब दिला की , ' मी काय निघून जायला आलोय काय ? कल्याण भिंवडीपासून सारं दख्खन कोकण काबीज करणार आहे मी.
हे सारं वकील आणि तिथंच घोड्यावर असलेली रायबाघन ऐकत होती. ती काहीही बोलत नव्हती. तिच्या डोळ्यापुढे आत्ताच आकाश फाटले होते. खानाने वकिलाला असे फेटाळून लावले. वकील आल्यावाटेने महाराजांकडे गेला. त्याने त्या टेकडीवर घोड्यावर असलेल्या महाराजांना खानाचा बेपर्वाई जबाब सांगितला. दया करणारे महाराज संतापले. आणि त्यांना त्या समारेच्या गर्द ऊंबरखिंडीत ठायीठायी दबा धरून बसलेल्या मावळ्यांना आपल्या पद्धतीने इशारा पोहोचविला. अन् एकदम त्या हजारो
मावळ्यांनी खालून चाललेल्या मोगली सैन्यावर बाणांचा आणि गोळ्यांचा मारा सुरू केला. मोगलांची क्षणात तिरपिट सुरू झाली. कोण कुठून हल्ला करतोय , कुठून बाण येताहेत हेच समजेना , गनिमी काव्याच्या हल्ल्याचा हा खास नमुना होता. अक्षरश: हलकल्लोळ उडाला. मोगलांना धड पुढेही जाता येईना अन् मागेही येता येईना , तुडवातुडव , चेंदामेंदी , आरोळ्या , किंकाळ्या यांनी ऊंबरखिंडीत हलकल्लोळ माजला. याचे नाव गनिमी कावा.

उंबरखिंड म्हणजे जणू १५ कि. मी. लांबीची बंदुकीची नळीच होती. मोगली सैन्याने उंबरखिंड पुरती ओलांडलेली नव्हती. त्या अरुंद जंगली खिंडीत ते भयंकर ठेचून निघत होते किंवा थेट स्वर्गात जात होते. या भयंकर चित्तेहल्ल्याची खबर धडपडत , धावत मोगली सरदारांनी पिछाडीवर असलेल्या आपले सेनापती कारतलबखान साहेबांना दिली. बातमी देणारे व्याकूळ झाले होते. हा भयंकर प्रकार खानाला अनपेक्षित होता. हे सगळेच बादशाही सरदार आपल्या प्रचंड सैन्यसंख्येवर आणि युद्धसाहित्यावर भाळलेले असायचे. त्यांना वाटायचं , मराठे मूठभर आहेत. मारून काढू. पण त्या मूठभर मराठ्यांची ताकद सुरुंगाच्या दारूसारखी होती.
कारतलबखान सुन्नच झाला. कारण पाठोपाठ सर्वनाशाच्या खबरा येऊ लागल्या. यावेळी ती रायबाघन आपल्या घोड्यावर गप्प बसलेली होती. खानाने आपला घोडा रायबाघनकडे वळविला आणि तो अगतिक शब्दांत तिच्याशी बोलू लागला , ' रायबाघनसाहिबा , अब मैं क्या करूं ? क्या हालत हो गयी अपनी ?'

त्यावर रागावलेली रायबाघन खानाला म्हणाली , ' पुण्याहून निघताना आपण मला सल्ला विचारला होतात का ? आपण शिवाजीच्या कोणत्या भागांत नि कसे जाणार आहोत हे ठाऊक होतं का ?'

खानाला आपली चूक कळून चुकली होती. पण आता या बाईच्या शिकवणीचा ऐन कल्लोळात काय उपयोग ? तो म्हणत होता , ' अब मैं क्या करूं ?'

यावर रायबाघनने अगदी स्पष्ट शब्दांत त्याला सुनावलं की , ' हे असलं साहस म्हणजे आत्मघातकी वेडेपणा आहे. मी अजूनही आपल्याला सांगते की , आपण मुकाट्याने शिवाजीराजांकडे ताबडतोब वकील पाठवा. शरण जा. क्षमा मागा त्याची. तो राजा फार मोठ्या उदार मनाचा आहे. अजूनही तो तुम्हाला क्षमा करील. नाही तर सर्वनाश! '
खरंच होतं. खानानं आपला वकील पाठविला. पण त्या प्रचंड गोंधळगदीर्त शिवाजीराजाला गाठण्यासाठी जायचं कसं ? अखेर मोठ्या धडपडीनं तो वकील महाराजांपर्यंत जाऊन पोहोचला , हे मोगलांचं नशीब.
त्यानं महाराजांच्या पुढे व्याकूळ होऊन विनवणी केली की , ' आम्ही माहीत नसलेल्या या मुलुखांत आलो. आमचे चुकले. आम्हाला माफ करा. आपल्या तीर्थरुपसाहेबांचा आणि कारतलबसाहेबांचा दोस्ताना फार मोठा आहे. आपण मेहरनजर करावी. आपण रहमदिल आहात. '

महाराजांनी मन मोठं केलं आणि म्हणाले , ' एकाच अटीवर. तुमच्या खानसाहेबांनी जे जे काही बरोबर आणलं आहे ते सर्व जागच्या जागी टाका. आणि रिकाम्या हाताने , निशस्त्र परत जा , कबूल ?' ' जी , कबूल '

खजिना , तंबूडेरे , घोडे , डंकेझेंडे आणि सर्व जखीरा , म्हणजे युद्धसाहित्य जागच्याजागी टाकून खान परत जाण्यास कबूल झाला. त्याला हे भागच होते. त्याची प्रचंड फजिती मावळ्यांनी केली होती.

खान परत निघाला. मान खाली घालून निघाला. त्याचे महत्त्व आणि स्थान कायमचे संपले. तो आयुष्यातून उठला. या उंबरखिंडीच्या युद्धात नेताजी पालकर , तानाजी मालुसरे , पिलाजी सरनाईक इत्यादी उर्मट हत्याऱ्याचे सरदार महाराजांच्या बरोबर होते. सर्वांनी मोगलांच्या विरुद्ध हत्यार चालवून हौस फेडून घेतली.

शाहिस्तेखानाचे हिशोबवहीत आणखी एक जबर पराभव जमा झाला.

माहिती स्त्रोत : इन्टरनेट
 — 
Share this article :

Post a Comment

 
Support : Asach Ekjan | Faltupna.in
Copyright © 2011. असाच एकजण - All Rights Reserved
Proudly Maintain by Boneless.in